Satara,Maharashtra,India
33 शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन, वेतनवाढ रोखली
आंतरजिल्हा शिक्षक बदली घोटाळा

अकोला : आंतरजिल्हा शिक्षक बदली घोटाळ्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. हा संपूर्ण घोटाळा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या संशयास्पद कागदपत्रांमुळे उघडकीस आला आहे.
या घोटळ्या प्रकरणात जवळपास 136 जणांवर कारवाईची टांगती तलवार होती. यातील तब्बल 33 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली आहे. अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला होता. तब्बल 268 शिक्षकांनी बदलीसाठी दिव्यांग आणि परित्यक्ता असल्याची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित करण्यात आलं होतं. चौकशीअखेर संबंधित 136 शिक्षक नियमबाह्य बदली प्रकरणात दोषी आढळले. आज सुमारे 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलेत. तर 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली आहे, असे आदेश अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी दिलेत.
136 पैकी उर्वरित शिक्षकांवर अद्यापही कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, नुसतं निलंबन करून चालणार नाही, फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे. या दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या पाठपुरावासाठी पिंपळे पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये. मात्र कारवाईने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय होत प्रकरण?
अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला होता. शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा बनाव केला. या प्रकरणात सुरुवातीला प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित केले होते.
तब्बल 268 पैकी 136 शिक्षक चौकशीकर दोषी आढळले. या संदर्भात तक्रारदार गणेश कुरई यांनी त्यावेळी सांगितले की, शिक्षकांनी बदली मिळवण्यासाठी दिव्यांगचे बोगस प्रमाणपत्र जोडले आहे. काहींनी परितक्त्या आणि एकल महिलांना मिळणाऱ्या लाभासाठी थेट पतीसोबत घटस्फोट झाल्याचा बनाव केला होता. काहींनी तर राहत असलेले ठिकाण बदलले आहे. या शिक्षकांना शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींनी साथ दिल्याची माहिती होती. या घोटाळ्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त होत होती.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.